भुसावळ (प्रतिनिधी) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसानंतर धरणात सातत्याने पाण्याची आवक वाढत असल्याने शनिवारी रात्री धरणाचे दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. धरणातून प्रती सेकंद ६२.८ क्युमेक्स अर्थात २२१८ क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे.
गतवर्षी मान्सूनपूर्व पावसामुळे धरणातून मे महिन्यातच विसर्ग झाला. तर मान्सून हंगामात पाऊस लांबल्याने ५ जुलै रोजी विसर्ग करण्यात आला होता. मात्र, यंदा २२ दिवस आधीच विसर्गाला सुरूवात झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी रात्रीपासून धरणात आवक वाढली तर शनिवारी रात्री आवकचे प्रमाण अधिक झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजता धरणातून पहिला विसर्ग करण्यात आला. दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून नदीपात्रात ६२.८ क्युमेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले.
दरम्यान, गेल्या आठवड्यात तापी नदीचे पात्र कोरडे पडले होते. आता हतनूर धरणातून पहिला विसर्ग झाल्याने नदी खळाळली. यामुळे शहरातील नागरिकांनी तापीला आलेला पहिला पूर पाहण्यासाठी पूल, इंजिनघाट, महादेव घाट, राहुल नगर घाटावर गर्दी केली होती. हतनूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे तापी नदी खळाळून वाहू लागली आहे. तापीचे पात्र कोरडे झाल्यानंतर प्रथमच त्यात हतनूर धरणातून पहिला विसर्ग केल्याने तापीला आलेला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर पाहण्यासाठी पुल, इंजिनघाट, महादेव घाट, राहूल नगर घाट आदी ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. हतनूर धरणात रविवारी सकाळी ८ वाजता २१०.६४० मीटर जलपातळी होती. तर २१९.६० दलघमी जलसाठा असून हा ५६.६० टक्के जलसाठा आहे.