मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाराष्ट्रात ९० ते ९२ टक्के ठिकाणी आज सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. या मशिदी चालवणाऱ्या मौलवींचे मी खास आभार मानतो, कारण आमचा विषय त्यांना नीट समजला आहे,’ असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
‘माझ्यासह पक्षातील इतर नेत्यांना आज सकाळपासून राज्यभरातून फोन येत असून परिस्थितीची माहिती दिली जात आहे. पोलिसांनी पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आणि ताब्यातही घेतलं आहे. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होत आहे, एवढाच माझा प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करत आहेत, त्यांना तुम्ही शिक्षा देणार आणि जे कायद्याचं पालन करत नाहीत, त्यांना तुम्ही मोकळीत देणार,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला.
मला मुंबईचा जो रिपोर्ट आला आहे, त्यानुसार शहरात १ हजार १४० मशिदी आहेत. त्यातील १३५ मशिदींवर सकाळची अजान ५ वाजण्याच्या आतमध्ये लावली गेली. काल मला आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की आमचं मौलवींशी बोलणं झालं आहे आणि ते सकाळी भोंग्यांवरून अजान लावणार नाहीत. मग या १३५ मशिदींवर कारवाई होणार का?’ असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.