कोल्हापूर (वृत्तसंस्था) रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी एकत्र येण्याचा ठेवलेला प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धुडकावून लावला. मात्र सदाभाऊ खोत यांनी अचानक समेटाची भाषा का केली? यामागे त्यांचं नेमकं राजकारण काय? याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भाजप छोट्या मित्रांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सदाभाऊ खोतांच्या रयत क्रांती संघटनेने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा एक प्रकारे भाजपाला हा इशारा होता तर आता शेट्टींसोबत एकत्र जाण्याची भाषा करून त्यांनी पुन्हा भाजपलाच इशारा दिल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून खांद्याला खांदा लावून प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी एकेकाळची ही जोडी…शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील म्हणून तत्कालीन सत्ताधारी भाजपसोबत सलगी केली. मात्र सत्तेच्या सारीपाटात यांच्यातच फूट पडली. सदाभाऊ खोतांनी राज्यमंत्रिपद उपभोगलं खरं मात्र त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडावी लागली. त्यानंतर शेट्टी आणि खोतांमध्ये विळ्या-भोपळ्याचं वैर निर्माण झालं. मात्र तरीही आता खोतांनी राजू शेट्टींसोबत समेटाची भाषा केली आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्या मागे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. एकतर भाजपला इशारा आणि दुसरा गरज पडली तर एकाला चालोचा नारा. दरम्यान, सदाभाऊ खोत यांची ही खेळी राजू शेट्टी यांनी हाणून पाडली आहे.