मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबईतील घडामोडींना वेग आला आहे. आता शिवसेनेकडून (Shivsena) आपले आमदार फुटू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल व्हा, असा आदेश दिल्याची माहिती आहे.
शिवसेना आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्रच ठेवले जाईल. जेणेकरून भाजपकडून कोणत्याही आमदाराला फूस लावणे शक्य होणार नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अपक्ष आमदारांचे मन वळवण्यासाठी स्वत: मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी सहा वाजता अपक्ष आमदारांची भेट घेणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या संजय पवार यांना मत देण्यासाठी अपक्ष आमदारांना कशाप्रकारे राजी करणार, हे पाहावे लागेल.
शिवसेनेचे शिष्टमंडळ हितेंद्र ठाकूरांच्या भेटीला
राज्यसभेच्या जागेसाठी बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) तीन आमदारांची निर्णायक मते मिळविण्यासाठी सध्या शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यासाठी शनिवारी भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर रविवारी खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत त्यांच्या भेटीला आले. या नेत्यांमध्ये तब्बल चार तास चर्चा रंगली होती.