मुंबई (वृत्तसंस्था) राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ऐनवेळी उमेदवारांसाठीचा मतांचा कोटा बदलला. 42 ऐवजी कोटा बदलून 44 केला आणि त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकसाठी आज मतदान होतंय. त्यासाठी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांचा निर्धारीत विजयी कोटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानक बदलल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्तं केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा सारवासारव करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीची 42 मतांचा कोटा पवारांना अचानक 44 चा केला आहे. यामुळे शिवसेनेने नाराजी व्यक्त केलीय. सेनेचे नेते रात्रीतून पवारांच्या भेटीला गेले. अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांचा कोटा वाढवल्याने आता मविआच्या चौथ्या जागेसाठीची मतांची जुळवाजुळव करताना दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परंतू संजय राऊत यांनी या बातम्या भाजपने पेरल्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.