चोपडा (प्रतिनिधी) येथील पाटील गढी खाईवाडा येथील हिवासी रवींद्र नारायण महाजन व मायाताई रवींद्र महाजन (पिग्मी एजंट) यांचे सुपुत्र तेजस महाजन व कुलदीप महाजन हे दोन्ही बंधू पिकलबॉल स्पर्धेनिमित्त भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘तैवान’ येथे रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे याआधी सुद्धा या दोन्ही बंधूंनी नांदेड, बेंगलोर,उत्तराखंड, इंदौर, नोएडा, नेपाळ, थायलंड, इंडोनेशियातील बाली,अशा विविध ठिकाणी स्पर्धक म्हणून विविध मेडल व रोख रक्कम बक्षीस स्वरूपात मिळालेली आहे. पिकल बॉल खेळाच्या निमित्ताने वारंवार ही संधी महाजन बंधूंना मिळत असते. चि. तेजस व कुलदीप यांना पिकल बॉल या खेळासाठी अरविंद प्रभू सर (विलेपार्ले मुंबई) यांचे नेहमी मोलाचे सहकार्य आहे. तेजस व कुलदीप हे सर्वसामान्य परिवारातील असून उच्चशिक्षित सुद्धा आहेत. तसेच एक सुसंस्कारित कुटुंब म्हणून या परिवाराची अगदी वेगळी ओळख समाजात आहे.
दोघांच्या या खेळाच्या निमित्ताने समाजातील सर्व मान्यवर परिवारातील नातलग तसेच मित्रमंडळी यांच्याकडून शुभाशीर्वाद नेहमीच पाठीशी आहेत. तसेच या दोन्ही बंधूंची अशीच उत्तरोतर प्रगती होऊन देशाचं नावलौकिक व्हावा तसेच परिवार व समाजाचे नावलौकिक हो, अशा शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.
















