मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केलेल्या खळबळजनक विधानामुळे भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राणेंवर सडकून टीका करत ‘राणेंचं ते विधान म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांचाच अपमान नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे’. असे त्यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भाजप नेते नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा करण्यात आलेला अपमान हा मुख्यमंत्र्यांचा नाही तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तो कदापि सहन केला जाणार नाही, असे सांगतानाच कोण कितीही मोठा असला तरी कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपकडून हिंसक राजकारण करण्यात आले. वातावरण बिघडवण्याचे काम करण्यात आले त्याचपध्दतीने भाजप महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता हे स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. राणे यांनी जी भाषा वापरली आहे ती अशोभनीय आहे. ही भाषा व हे राजकारण महाराष्ट्र कधी स्वीकारत नाही हे भाजपला कळले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.