मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देऊ नका, असा कोणताही प्रस्ताव भारतीय जनता पक्षाने (BJP) महाविकास आघाडीला दिलेला नाही, असा खुलासा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (mp imtiaz Jalil) यांच्या दाव्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केला.
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नसती तर भाजप विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करायला तयार होती, असा दावा एमआयएमचे खासदार जलील यांनी केला होता. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दानवे बोलत होते.
दानवे म्हणाले की, आमचा असा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीकडे गेलेला नाही. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये याबाबत चर्चा झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विषय आहे, आम्ही कोणाचं नाव का बरं सुचवावं, असा प्रश्न दानवे यांनी केला.
एकनाथ खडसे यांना पराभूत करण्यासाठी भारतीय पक्षाने प्लॅनिंग आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावर बोलताना दानवे म्हणाले की, आम्ही एकनाथ खडसे यांनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांना हरवणार आहेात, आम्ही कोणत्याही व्यक्तीला हरवण्यासाठी निवडणूक लढवत नाही.