अमळनेर (प्रतिनिधी) स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी पित्याला येथील जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी मरेपर्यंत जन्मठेप, तीन वर्षे सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली आहे. ही घटना १३ फेब्रुवारी २०२० रोजी पारोळा तालुक्यातील एका गावात घडली होती.
दारू पिऊन केला होता अत्याचार
पीडिता ही घरी एकटीच असताना तिचा बाप हा दारू पिऊन आला व त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. तिची आई त्यावेळी विवाह समारंभानिमित्त पिंप्री, ता. रावेर येथे गेलेली होती. यानंतर १७ जून २०२० रोजी वासनांध बापाने पुन्हा अत्याचार केला. यावेळी पीडितेची आई ही आरोपीच्या वडिलांचे निधन झाल्याने परंपरेप्रमाणे उत्तरकार्य संपल्यावर आपल्या माहेरी गेली होती. आरोपी हा अटकेपासून कारागृहातच होता. सरकारी वकील अॅड. किशोर आर. बाल यांनी ११ साक्षीदार तपासले.
असे आहे शिक्षेचे स्वरूप
याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश एस. बी. गायधनी यांनी आरोपीला बाल लैंगिक अत्याचार कलम ४(२)प्रमाणे मरेपर्यंत जन्मठेप व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार कलम ६प्रमाणे मरेपर्यंत जन्मठेप व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन वर्षे शिक्षा तर भादंवि कलम ५०६ प्रमाणे ७ वर्षे सश्रम कारावास व १ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षाचा सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा अटकेपासून कारागृहातच होता.
उच्च न्यायालयाने दिली गर्भपाताची परवानगी
सर्वसाधारणपणे १३ ते १४ आठवड्यापर्यंत शासकीय डॉक्टरांना गर्भपाताची परवानगी असते व २५ आठवड्यापर्यंत जिल्हा सत्र न्यायालयाला परवानगी देण्याचे अधिकार असतात. मुलीवर उपचार करताना २५ आठवडे उलटले होते. म्हणून पोलिसांच्या मदतीने सुट्टीच्या दिवशी उच्च न्यायालय उघडून अर्ज करून उच्च न्यायालयाने गर्भपाताची परवानगी दिली होती.