नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे. अशातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतधोरण जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी जीपीडी वाढीचा दर १०.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पतधोरण आढावा समितीची सोमवारपासून बैठक सुरू होती. आज बैठक संपल्यानंतर शक्तिकांता दास यांनी पतधोरण जाहीर केलं. “कोरोनाचं संक्रमण वाढत असलं तरी अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढल्याने अनिश्चिततेतही भर पडली आहे. असं असलं तरी भारत आव्हानांवर मात करण्यासाठी तयार आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर ५ टक्क्यांवर होता,” असं शक्तिकांता दास यांनी सांगितलं.
पतधोरण आढावा समितीनं रेपो रेट ४ टक्के कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्केच निश्चित करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे अर्थव्यवस्थेसमोर पुन्हा आव्हान उभी राहण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी २०२१-२२ या आर्थिक वर्षात जीडीपी १०.५ राहणार असल्याचा अंदाज आयबीआयने व्यक्त केला आहे. मागच्या पतधोरणातही रिझर्व्ह बँकेने जीडीपी वाढीचा हाच अंदाज वर्तवला होता.