मुंबई वृत्तसंस्था एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सहभागी झालेल्या केसरकर यांचे एक पत्र आज शिंदे गटाकडून प्रसारित करण्यात आले. जनतेतून कधीही निवडून येऊ न शकणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गळ्यातील ताईत बनून आता शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सहभागी केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. ”उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांत दरी वाढविण्याचे पाप संजय राऊत यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंदूक चालवायची. खांदा संजय राऊतांचा वापरायचा आणि त्यातून पक्षाचे शत्रू नव्हे तर आम्हीच मारले जाणार. हे आम्हाला मान्य नाही,” असे केसरकर यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा युती झाल्यानंतर संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करत विष ओकण्यास सुरूवात केला. राज्यातही सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून काम करायचे आणि मोदी सरकारवर टीका करायची यातून दोन पक्षांतील तूटातूट करण्याचे काम पद्धतशीरपणे करण्यात आले. दररोज अश्लाघ्य शब्दात टीका होत होती. जी भाषा कोणी वापरत नाहीत ती भाषा संजय राऊत यांच्या तोंडी कायम असते. आमदारांनी ही बाब वेळोवेळी पक्ष नेतृत्वाच्या लक्षात आणून दिले. पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता, असे केसरकर यांनी म्हटले आहे.