जळगाव (प्रतिनिधी) ईच्छादेवी चौफुली ते डी मार्ट पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई तात्काळ सुरू करावी अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या. तसेच गणपती नगरात एलईडी बसविण्याचे काम देखील हाती घ्यावे असे त्यांनी सांगितले.
महास्वच्छता अभियानात महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सदाशिव ढेकळे, मनोज आहुजा, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, अमित काळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, प्रशंत नाईक, भरत सपकाळे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, प्रभाग समिती सदस्य संजय विसपुते, अनिल जोशी, सहआयुक्त पवन पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, एस. एस. पाटील, बाबा साळुंखे, उदय पाटील आदींसह इतर अधिकारी सहभागी होते.
मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवा
ईच्छादेवी चौफुली ते डी मार्टपर्यंत असलेल्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करायचे असून रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण असल्याने कामासाठी अडचण येत आहे. तसेच काही ठिकाणी अमृत योजनेच्या गळती दुरुस्त करण्यात आल्या नसल्याने काम रखडले असल्याची तक्रार मक्तेदाराने महापौरांकडे मांडली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत लागलीच अतिक्रमण विभागाला सूचना देत अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तसेच अमृतच्या मक्तेदाराला पाईपलाईन दुरुस्तीच्या सूचना केल्या. तसेच डी मार्ट समोरील बाजूस सुशोभीकरणाचे सुरू असलेले काम का रखडले याची माहिती घेऊन ते पुन्हा सुरू करण्याचेही महापौरांनी सांगितले.
गणपती नगरात एलईडी नाही, मोकळ्या जागी चालतात गैरप्रकार
गणपती नगरात ३-३ दिवस रस्त्यांची साफसफाई नसते, परिसरातील अनेक पथदिवे बंद आहे, धोकादायक झाडे केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, काही खाजगी मोकळ्या प्लॉटवर घाण टाकण्यात येते अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी संबंधित अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या. तसेच समस्या न सुटल्यास नागरिकांनी फोन करावा असेही त्यांनी सांगितले. मनपा मालकीच्या गट क्र.४३४ च्या मोकळ्या जागेवर एका संस्थेने सुरू केलेले बांधकाम तसेच पडून आहे. त्याठिकाणी तळघरात पाणी साचून डास, मच्छर होतात, मोकळ्या जागेला सुरक्षा भिंत नसल्याने रात्रीच्यावेळी अनेक गैरप्रकार होत असतात तसेच त्याठिकाणी कचरा देखील वाढला असल्याची समस्या नागरिकांनी मांडली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी याबाबत माहिती घेतली असता मोकळ्या भूखंडाच्या विकासासाठी मनपाने ४२ कोटीतील विकासकामांमध्ये त्याचा समावेश केला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करा, घंटागाडी सुरू करा
डी मार्टच्या बाजूला तांबापुरा समोरील रस्त्यावर नागरिक शौचास बसतात. मनपाने अनेक उपाय केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे नगरसेविका आणि मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. महापौरांनी सूचना देत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करा, असेही त्या म्हणाल्या. परिसरात कुठे पर्यायी शौचालय उभारता येईल का हे तपासण्याचे महापौरांनी सांगितले. प्रभाग १३ मध्ये एक घंटागाडी नादुरुस्त असल्याने नागरिकांना त्रास होत आहे अशी तक्रार नगरसेवकांनी केली. मक्तेदाराला बोलावून, घंटागाडी नसेल तर इतर कोणत्याही वाहनाची तात्काळ व्यवस्था करावी. दररोज कचरा संकलन व्हायलाच हवे, अशा सूचना महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिल्या.
मुख्य रस्त्यावरील गटारीच्या कामासाठी ‘नही’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा
शिरसोली मुख्य रस्त्यावर कब्रस्थान समोर असलेल्या मोठ्या गटारीचा स्लॅब काढण्यात आला असून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच गटार अरुंद झाल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते अशी तक्रार नागरीक व नगरसेवकांनी केली. शिरसोली रस्ता महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येतो अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी लागलीच ‘नही’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता गटारीवरील स्लॅब कल्व्हर्ट, पाईप काढून गटारीची रुंदी वाढवावी. काम शक्यतो रात्रीच्यावेळी करावे असे सांगितले. संबंधित रस्त्याचे अधिकारी धुळे येथील महाले हे असल्याची माहिती त्यांनी दिली असता महापौरांनी त्यांच्याशी देखील संपर्क केला.
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस, दंड
बुधवारी महास्वच्छता अभियानासाठी मनपाच्या ४३६ कायम कर्मचाऱ्यांपैकी ३९३ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३६१ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ४३ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ३९ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.
दिवसभरात उचलला २९० टन कचरा
सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून २९० टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. मोहीम असलेल्या सहा प्रभागातून तब्बल २० टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहीममुळे इतर प्रभागात अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.