छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) सध्या राज्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शांतता नांदावी, यासाठी येत्या २५ जुलैपासून वंचित बहुजन आघाडी राज्यभरात आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. या आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात दादरच्या चैत्यभूमीपासून होऊन या यात्रेचा समारोप छत्रपती संभाजी नगरात ७ व ८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अॅड. आंबेडकर म्हणाले, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ओबीसीचे काही नेते व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ओबीसीचा लढा तुम्ही हातात घ्यावा, अशी विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन आरक्षण बचाव यात्रा काढण्यात येत आहे. आजची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अंत्यत भयानक अशी झाली आहे. ओबीसी विरुद्ध मराठा असा काही श्रीमंत मराठ्यांनी वाद लावला आहे. यांची भीती अनेक ओबीसींना वाटत आहे.
एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत श्रीमंत मराठे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, काँग्रेस आपली भूमिका मांडत नाही तोपर्यंत यावर तोडगा निघणार नाही असेही आंबेडकर म्हणाले. येत्या २५ जुलैपासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दादरच्या चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात होऊन फुलेवाडा येथे जाईल. त्यानंतर २६ जुलै रोजी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षण करण्याची घोषणा केली होती.
या ठिकाणी आरक्षण बचाव जंग यात्रा काढण्यात येईल. त्यानंतर ही यात्रा सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदडे, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, जालना येथे जाईल. काही ठिकाणी कॉर्नर बैठका तर मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येतील. या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप छत्रपती संभाजीनगरात ७ व ८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले.