पाचोरा (प्रतिनिधी) मिनी लॉकडाऊनमुळे लहान मोठे व्यापारी, उद्योजक व कामागारांचे कंबरडे मोडले असून मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने मिनी लॉकडाऊनचा फेरविचार करावा, अन्यथा व्यापाऱ्यांसह रस्त्यावर आंदोलन करावे लागेल असा थेट इशारा खासदार उन्मेश पाटील यांनी दिला आहे. खासदार पाटील यांनी पाचोरा ग्रामीण रूग्णालयाला आज भेट देवून रूग्णांशी चर्चा केली.
त्यानंतर पाचोरा येथील कापड, सराफ, रेडिमेड कपडे, ऑटोमोबाईल, वाहन दुरूस्ती गॅरेज हार्डवेअर सिमेंट स्टील व्यापारी, बुट चप्पल, इलेक्ट्रिक जनरल स्टोअर्स व्यापारी आदींची बैठक आज पाचोरा बाजार समितीच्या समोरील अटल जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यापाऱ्यांची भावना समजून घेतली.
यावेळी सुनिल सराफ, नगरसेवक मनीष भोसले, राजेश संचेती, जगदीश पटवारी, प्रदीप कुमार संचेती यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आम्हाला जाचक अटींमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे सांगीतले.
खासदार उन्मेश पाटील यांनी लागलीच फोनवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेशी बोलून लॉकडाऊन बाबत फेरविचार करावा अशी मागणी केली. अन्यथा व्यापाऱ्या सोबत रस्त्यावर आंदोलन करावे लागेल अशी भुमिका मांडली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भावना शासनाला कळवतो असे सांगितले.