भुसावळ (प्रतिनिधी) घरबसल्या ऑनलाइ हयातीचा दाखला ऑनलाइन काढण्याच्या बहाण्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला साडेतीन लाखांचा गंडा.घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला काढून देतो, या बहाण्याने एका निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घातला आहे. अवघ्या १५ मिनिटांत फसवणूक करणाऱ्याने त्यांच्या बँक खात्यातील रक्कम उडवली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळातील डी. एस. ग्राउंड परिसरातील रहिवासी आणि बँक ऑफ बडोदाचे निवृत्त अधिकारी यांनी फेसबुकवर ‘हयातीचा दाखला ऑनलाइन करा, घरबसल्या सोयीस्कर सेवा’ अशी जाहिरात पाहिली. संबंधित लिंक उघडून त्यांनी त्यात आपली माहिती, बँकेचे नाव, शाखा, मोबाइल क्रमांक आदी माहिती भरली. यानंतर २४ ऑक्टोबरला भूपेंद्रदास गुप्ता नावाच्या व्यक्तीचा त्यांना फोन आला. त्याने स्वतःची हयातीचा दाखला पडताळणी अधिकारी अशी ओळख करून दिली.
त्यानंतर आपण दिलेल्या माहितीची पडताळणी करायची आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याने व्हॉट्सअॅप कॉलवर संपर्क साधून ई-मेल आयडी आणि तीन वेगवेगळे पासवर्ड विचारले. त्यानंतर त्या व्यक्तीने फोन सुरू ठेवण्यास सांगताच निवृत्त अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून ३ लाख ५० हजार रुपये विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे वळवले. तर फसवणुकीची जाणीव होताच संबंधितांनी बँक ऑफ बडोदा शाखेत धाव घेतली, तसेच मुंबई मुख्यालयालाही कळवले, पण तोपर्यंत सर्व रक्कम काढण्यात आली होती.
झारखंडहून फसवणुकीचा मागोवा
या घटनेची माहिती जळगाव येथील सायबर सेलला देण्यात आली. प्राथमिक तपासात फसवणुकीचे धागेदोरे झारखंड राज्यात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास पो.नि. उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
















