भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी दरम्यान महादेव तांडा फाट्यावर रस्ता लुटीचे प्रकार सुरू असून यामध्ये काही वाहन चालक किरकोळ जखमी झाल्याचे सकाळी उघडकीस आल्याने अपडाऊन करणाऱ्या वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि. १३ जून २०२१ रविवार च्या मध्यरात्रीच्या सुमारास ११.३० वाजेच्या दरम्यान भुसावळ-जामनेर रस्त्यावरील मांडवादिगर जवळील पोलीस चौकी ते वाघूर नदी जवळील महादेव तांडा फाट्यावर रस्ता लूट करणाऱ्यांनी रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी खाट टाकून उर्वरित रस्त्यामध्ये दगड ठेवून जाणाऱ्या ट्रकच्या कांचा फोडून नुकसान केल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याबदरम्यान १ ते ४ दुचाकी मोटरसायकल स्वार सुद्धा किरकोळ जखमी झाल्याची माहिती नागरिकांनी दिली.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी साधला संपर्क
रस्ता लुटीच्या प्रकरणा संदर्भात भुसावळ मधील दैनिक लोकमतचे छायाचित्रकार हबीब चव्हाण यांच्याशी चार चाकी स्वार यांनी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली.यानंतर लागलीच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्याशी संपर्क साधून रस्ता लुटीबाबत माहिती दिली असता पोहचण्याचे सांगितले.अर्धा तास झाल्यानंतरही घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी न पोहचल्याने शेवटी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधतात जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी १५ मिनिटांत घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहचले.
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
महादेव तांडा फाट्याजवळ सुरू असलेली रस्ता लुटीचे माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळताच पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता तब्बल १५ मिनिटात जामनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश धुगे, सुनील माळी, होमगार्ड पथक तसेच गावातील नागरिकांना हातात लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
गावकऱ्यांनी गारखेडा जवळ वाहने थांबविली
रस्ता लूट सुरू असल्याची माहिती आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मिळाल्याने नागरिकांनी जामनेर वरून भुसावळकडे जाणारी वाहने अर्धा तास थांबवून पोलीस अधिकारी आल्यानंतर जाण्यास चालकांना सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी व निरीक्षकांनी फिरविली पाठ
महादेव तांडा फाट्याजवळ रस्ता लुटीचा प्रकार सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी मध्यरात्री घटनास्थळी न पोहचल्याने तसेच एकही कर्मचारी न पाठविल्याने या प्रकरणाकडे जणू पाठ फिरविल्याचे दिसत आहे.
















