धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पष्टाने येथे मामांकडे शिक्षण घेत असलेल्या कु. रोशनी योगेश जगताप या विद्यार्थीनीचा हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू झाला. सर्वांशी सतत हसमुख संवाद साधणाऱ्या रोशनीच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
रोशनी ही पष्टाने येथे विजय शांताराम शिंपी (मामा) यांचेकडे रहात होती. ती धरणगावी अकरावीत शिकत होती. मंगळवारी पाच वाजता ती घाबऱ्याघुबऱ्या घरातून ओट्यावर आली. तशी ती पायऱ्यावर बसली. गुडघ्यात डोकं टेकवून ती बसली. थोड्या वेळातच तिची मामी, शेजारणींनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती उठलीच नाही. रोशनीच्या आईचे माहेर पष्टाने होते. तिला शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ (मंदाणे) येथे दिले होते. योगेश मगनशेठ शिंपी यांची ती कन्या. पंधरा वर्षांपूर्वी मुलाला जन्म देताना तिची आई मृत्यू पावली होती. तेव्हा रोशनी ३ वर्षाची होती. तेव्हा पासुन तिचा सांभाळ तिचा मामांनीच केला.
रोशनी हिला धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉ. गिरीश चौधरी यानी मृत घोषित केले. पंचनामा करून तिला तिचा गावी दाऊळ येथे नेण्यात आले आहे. तिथे बुधवारी सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तिच्या पश्चात वडील, एक मोठी बहिण आणि एक लहान भाऊ आहे.