मुंबई (वृत्तसंस्था) निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला सीबीआय तपास करत असलेल्या खंडणी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे.
व्यापारी विमल अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आरोप केला होता की कोविड काळात वाझे आणि काही लोकांनी हॉटेल चालवण्यासाठी त्यांच्याकडून खंडणी मागितली होती. या प्रकरणी दाखल एफआयआर मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, गुंड रियाज भाटी, सचिन वाजे, सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांचा समावेश आहे.
या खंडणी प्रकरणी सचिन वाझे , सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली होती. मात्र, परमबीर सिंग, रियाझ भाटी यांना अटक करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल यांना जामीन मिळाला होता. आज सचिन सचिन वाझेला 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज सत्र न्यायालयात जामीन मंजूर झाला असला तरी वाझे तुरुंगातच राहणार आहे.
वाझे यांच्यावर चार गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरील दोन प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. एका प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. तर अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना दोन प्रकरणात जामीन मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी गाजलेलं अँटिलिया प्रकरण फारच गुंतागुंतीचं झालं होतं. 25 फेब्रुवारी 2021 रोजी, मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर एक महिंद्रा स्कॉर्पिओ आढळली होती. ज्यामध्ये तब्बल 20 जिलेटिनच्या कांड्या असलेली बॅग आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्राजवळील खाडीत सापडला होता. प्रकरणाचे धागेदोरे सचिन वाझे याच्यापर्यंत येऊन ठेपले होते.