मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवडक भाषणांचे ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाचे प्रकाशन आज नेहरू सेंटर येथे झाले. या पुस्तकाचे प्रकाशन शिवसेना खासदार संजय राऊत आणि साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात “पवारांच्या विचारांना भगवं कव्हर घातलंय” असं वक्तव्य केलं आहे.
तुमच्या विचार ग्रंथाला भगवं कव्हर घातलं गेलंय. अवघा रंग एकची झाला. संजय राऊत कोणत्या रंगाला भुलत नाही. पण हा महाराष्ट्राचा रंग आहे. ६१ विविध विषयांवरील भाषण या पुस्तकात आहेत. या पुस्तकाची प्रत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देऊ. शरद पवार सतत विचार देत असतात. नेमकचि बोलणे याची फोड करुन पंतप्रधान मोदींना सांगू”, असं संजय राऊत म्हणाले.
“मी शरद पवार यांना खुर्ची का दिली? हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक, हा ग्रंथ वाचला पाहिजे. त्यांचा तो मान आहे. सध्या देशात विकृत राजकारण सुरु आहे, त्यावर पवारांनी २०-२५ वर्षांपूर्वी ताशेरे ओढले. ३० वर्षांपूर्वी भाजपला देश एकसंघ नको हे सांगितलं. हे आम्हाला आता समजलं”, अशा शब्दांत राऊतांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “प्रश्न विचारणाऱ्यांची सध्या काय स्थिती आहे ते पाहतो. मात्र शरद पवार यांना प्रश्न विचारलेले आवडतात. त्यावर ते उत्तर शोधतात. विचार मांडायचाच नाही ही झुंडशाही आहे. याचा आज आपण सामना करत आहोत”, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
शरद पवार यांची भाषणं ऐकताना दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार ऐकतोय, असं वाटलं. ६१ भाषणात कुठेतरी यशवंतराव चव्हाण बोलत आहेत, असं वाटलं. या आधीही पवारांशी जेव्हा जेव्हा संपर्क साधला तेव्हा महाराष्ट्र, माणूस आणि माणुसकी दिसली. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० मुलाखती घेतल्या होत्या. पुढील पिढीला ते समजणं गरजेचं असतं”, असं राऊत म्हणाले.