मुंबई (वृत्तसंस्था) सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. सहाव्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या राज्यातील राजकराण तापले आहे. छत्रपती संभाजी राजेंनी (Sambhaji Raje) राज्यसभा निवडणूक अपक्ष लढण्याची घोषणा करत सहाव्या जागेवर दावा केला आहे. यातच भाजप (BJP) चे नेत निलेश राणे यांनी त्या खासदारकीला लाथ मारा असे अवाहन संभाजी राजे यांना केले आहे.
शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी ट्विटरवरुन शिवसेनेवर निशाणा साधलाय. “कोल्हापूरचे छत्रपती संभाजी, आज रात्रभर विचार करा की ज्या पक्षाने मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली, तुमच्याकडे महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितले, औरंगजेबच्या कबरीला संरक्षण दिले, पक्षात १२ वाजता या सांगून तुमची काय किंमत ठेवली? लाथ मारा त्या खासदारकीला,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
शिवसेना आणि संभाजीराजेमंध्ये काय संवाद झाला?
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे.
वर्षावर आज भेट
विधानसभा आमदारांमधून निवडून द्यावयाच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे. त्यानंतर संभाजीराजे छत्रपतींनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांची उमेदवारी जाहीर करू असा पवित्रा शिवसेनेनं (Shiv Sena) घेतला आहे. यानंतरच छत्रपती संभाजी राजेंना वर्षावर येण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान संभाजीराजेंनी निमंत्रण स्वीकारलं. खासदारकीसाठी संभाजीराजे शिवबंधन बांधणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान अजून तरी राजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे.
















