मुंबई (वृत्तसंस्था) समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदवला. समीर वानखेडेंना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेनं घेतली. यानंतर काही मिनिटांच्या अंतरानं राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकही पाठोपाठ चैत्यभूमीवर पोहोचले. त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, “बाबासाहेबांना अभिवादन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. अभिवादन करणारे एखाद्या धर्माचे, समाजाचे असं म्हणणं चुकीचं आहे. आम्ही दरवर्षी इथे येतो. काही लोकांनी येणं सुरु केलं आहे हे चांगलं आहे,” असं नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे याआधी चैत्यभूमीवर आल्याचं पाहिलं का? या प्रश्नावर बोलताना त्यांना त्याबद्दल माहिती नाही, पण माझ्यासोबत नमाज पठण करायचे हे खरं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.












