मुंबई (वृत्तसंस्था) जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या ६० ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यात चोपडा तालुक्यातील धानोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा या गावांच्या योजनांचा समावेश आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन उच्चाधिकार समितीची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील मजीप्राअंतर्गत मान्यता मिळालेल्या ६० योजनांना मंजुरी देण्यात आली. यासाठी ८५८ कोटी ५ लक्ष ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती-१५, बुलढाणा-२, नागपूर-१, भंडारा-३, वर्धा-२, वाशीम-८, रत्नागिरी-२, रायगड-२, ठाणे-१, नगर-८, जळगाव-२, लातूर-३, परभणी-२, कोल्हापूर-३ तर पुणे जिल्ह्यातील ७ योजनांचा समावेश आहे.
यात चोपडा तालुक्यातील धानोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. यातील धानोरा येथील योजना १५ कोटी ८९ लक्ष ५० हजार रुपयांची तर उचंदा सात गावांची योजना १३ कोटी ४५ लक्ष ८९ हजार रूपयांची आहे. चोपडा आणि मुक्ताईनगर येथे झालेल्या तालुका यांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धानोरा आणि उचंदा या गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा स्थानिक आमदारांच्या मागणी नुसार शब्द दिला होता. आज या दोन्ही गावांच्या योजनांना मंजुरी देऊन पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. योजनांसाठी चोपडा येथील आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे तसेच मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणी नुसार व पाठपुराव्याने सदर योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच गावकऱ्यांनी या योजनेसाठी मागणी केली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.