धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी गावात भल्या पहाटे पाच वाजताच पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने संयुक्त कारवाई करीत गावातून तब्बल ५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक आणि डंपर जप्त केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. यावेळी विविध ठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली.
जिल्ह्यातील बेसुमार वाळू उपशाळा आळा घालण्यासाठी शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या निर्देशानुसार शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच तीनही विभागाचे पथक बांभोरी गावात पोहचले व कारवाई सुरू केली.
बांभोरीनजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याने पथकाने या नदीपात्रात जाऊन पाहणी केली. तेथे काही वाहने आढळली. ही ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर गावातील अनेक ट्रॅक्टर, ट्रक, डंपरमधून वाळू वाहतूक होत असल्याने गावातील ही वाहने जप्त करण्यात आली. गावातून तब्बल ६७ वाहने जप्त करण्यात आली. गावात ५३ ट्रॅक्टर, १४ ट्रक, डंपर पथकाने जप्त केले. एवढेच नव्हे तर, गावात ठिकठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळू जप्त देखील जप्त करण्यात आली. दरम्यान, ज्या वाहनांचा वाळू चोरीमध्ये सहभाग नसेल अशा वाहनांच्या कागदपत्रांची चौकशी केल्यानंतर सोडले जाणार असल्याचे कळतेय. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.