मुंबई (वृत्तसंस्था) संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असं म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो, अशा शब्दात संजय राऊतांनी भुमरे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडली, असं काही बंडखोर आमदारांनी जाहीरपणे म्हटल्यानंतर संजय राऊतांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. जेव्हा त्यांनी मुंबईतून पलायन केलं, तेव्हा ते म्हणत होते की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष निधी देत नव्हता म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या वेळी त्यांनी सांगितलं की पक्षातले काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून बाहेर पडलो. आता चौथ्या वेळा ते माझं नाव घेत आहेत. नेमका त्यांनी पक्ष का सोडला, त्यांनी हे पाऊल का उचललं याविषयी त्यांनी स्वत:ची कार्यशाळा घेतली पाहिजे.
आजही ते आमचे आहेत. आजही आम्ही एका नात्याने बांधले गेलो आहोत. पण नेमकं कारण ठरवा. गोंधळून जाऊ नका. तुम्ही एकदा ठरवा की तुम्ही नेमके का गेले आहात”, असं राऊत म्हणाले. माझं आमच्या जुन्या सहकाऱ्यांना आव्हान आहे. गोंधळू नका. तुम्ही का गोंधळला आहात, ते मला माहिती आहे. संजय राठोड आदल्या दिवसापर्यंत माझ्यासोबत बसले होते. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असं म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. सगळं आहे. संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती असल्याचेही राऊत म्हणाले.