मुंबई (वृत्तसंस्था) गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच वाघ आहे, असे वाटेल. पण मायला ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना इशारा दिला आहे. ते दहीसरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
संजय राऊत पुढे म्हणाले ज्याने बाळासाहेब ठाकरेंची गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे श्राप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. शिवसेनेला बंड नवीन नाही. त्याचसोबत शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं हे गुलाबराव पाटील आहेत. भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच वाघ आहे, असे वाटेल आणि आता आता ढुंगणाला पाय लावून पळाला. गुलाबराव पाटील पुन्हा पानटपरीवर बसेल, असेही राऊत म्हणाले.
गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले.
महानगरपालिका प्रचंड बहुमताने जिंकलो तर हे ४० चोर, रेडे कायमचे मातीत गाडले जातील. शिवसेनेत ही कीड कायमची संपून जाईल. अनेकांना शिवसेनेने खूप काही दिले. बंडखोरांनी एकमेकांचे कपडे फाडले. बंडखोर हे चड्डी बनियन टोळी झाली आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना, ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगणारी शिवसेना आहे. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठीची शिवसेना ती कुणालाही नष्ट करता येणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला.