नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय आणि उद्योजक प्रवीण राऊत यांना बुधवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केली. प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईनंतर संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर पुष्पा चित्रपटातील ‘झुकेंगे नहीं’ हा डायलॉग मारत टीका केली आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणतात, ‘आधी आमिष दाखवले, ऑफर्स दिल्या. मग घाबरवले, धमकावले पण आम्ही झुकलो नाही. नंतर कुटुंबाला धमकावले. आम्ही दुर्लक्ष केले जाऊ दिले. त्यानंतर केंद्रीय एजन्सी आमच्या मागे लावल्या. हे असेच २०२४ पर्यंत चालेल.. पण आम्ही कधीच झुकणार नाही!’, असे संजय राऊत म्हणाले. आपल्या ट्विटमध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टॅग केले आहे.
‘कुछ मिला क्या?’
दरम्यान, संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळीही त्यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य केले. मोदी सरकार राजकीय विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई करते. आम्ही त्या कारवाया २०२४ पर्यंत सहन करू. त्यांना काय सर्च करायचे आहे ते सर्च करू द्या. मी त्यांना विचारतोय ‘कुछ मिला क्या?’ हा खेळ असाच सुरू राहणा, अशी टीका संजय राऊत यांनी केली.