धरणगाव (प्रतिनिधी) आपले सत्व आपल्याला नेमकेपणाने कळले तर आपण सर्वजण स्वयंप्रकाशित होऊ शकतो हा सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातून खरा संदेश आहे तेच त्यांच्या जीवनाचेही मर्म आहे असे मत मुख्याध्यापक डाँ. संजीव कुमार सोनवणे यांनी अध्यक्षपदावरून व्यक्त केले.
येथील शतकोत्तर पी.आर. हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित सावित्री उत्सवात ते बोलत होते. मंचावर उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ ,पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक डॉ. बापू शिरसाठ, वसंत चौधरी, डी.एस. पाटील, एस.डी.मोरे, व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील बालकलाकार उपस्थित होते. सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्ल्यार्पण करण्यात आले. यानंतर” मी सावित्री बोलतेय “हा एकपात्री प्रयोग नववीतील मानवी चौटे या विद्यार्थिनीने सादर केला. स्त्री शिक्षणाविषयी समाजाचे अज्ञान, अंधश्रद्धा, जाचक रूढी, परंपरा आणि कर्मठ विचारांचे तत्कालीन लोकजीवन याविषयी या एकपात्री प्रयोगात माहिती देण्यात आली. यानंतर “आई सावित्री” या नाट्यप्रवेशातून सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्यात येणाऱ्या अडचणी , त्यांना समाजातून होणारा विरोध, स्त्री शिक्षणाविषयी समाजाची असलेली उदासीनता अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्त्री शिक्षण मानवी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे हा महत्त्वपूर्ण संदेश या नाट्यप्रवेशातून अवंती पिंपळगावकर , ज्योत्स्ना पवार, पल्लवी महाजन, भाग्यश्री मोरे, सारिका धनगर, पुनम माळी, धनश्री कासार, किंजल परदेशी या विद्यार्थीनींनी दिला.
यानंतर पुजा महाजन, करुणा मोरे, कल्याणी महाजन, राणी जाधव, दिव्या पवार, यश पगारिया या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित आपली मनोगते मांडली. शिक्षक राजेश खैरे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन कार्यावर आधारित स्वरचित कविता सादर केली. एनसीसी अधिकारी डी. एस. पाटील, आर.एल.पाटील व राजेश ठाकरे यांची भाषणे झाली. डॉ. बापू शिरसाठ, गोपाल चौधरी यांनी गीते सादर केली. संयोजक डॉ. बी.डी. शिरसाठ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेतला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे त्यांनी दिली. पर्यवेक्षक कैलास वाघ यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पेन बक्षीस म्हणून दिले. कार्यक्रमाचे नियोजन भाषा विभाग प्रमुख डॉ. बापू शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन धनश्री कासार हिने तर आभार किंजल परदेशी हिने मानले. यशस्वीतेसाठी नववीच्या वर्गाने व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.














