जळगाव (प्रतिनिधी) विज्ञान हे आपल्या आसपासच असते. त्याचे निरीक्षण करून परिस्थितीची जाणिव करून संशोधनात्मक चांगले निष्कर्ष काढता येऊ शकतात. यासाठी पाचही ज्ञानेंद्रीयांचा जागृतपणे वापर केला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी का, कुणासाठी, कोणते, कसे, केव्हा, कधी, कुठे अशा प्रश्नांची स्वतः उकल करण्यासाठी प्रेरीत झाले पाहिजे. अनुभूती इंग्लिश मिडीयअम सेकंडरी स्कूल येथे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्था आयोजित तीन दिवसीय शिबीराचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाला, असे मनोगत जन्मजेय नेमाडे यांनी व्यक्त केले.
अनुभूती स्कूलमध्ये दि.18 ते 20 या दरम्यान सुरू असलेल्या विज्ञान शिबीराच्या समारोपाप्रसंगी जन्मजेय नेमाडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अनुभूती विद्यालयाच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, ए. टी. झांबरे विद्यालयाचे शिक्षक महेंद्र नेमाडे, ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे ओंकार बाणाईत, डॉ. विणाताई लिमये, अखिलेश कसबेकर, कल्पेश कोठाळे, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. ए. टी. झांबरे आणि अनुभूती इंग्लिश मिडीअम सेकंडरी स्कूलच्या 40 विद्यार्थ्यांनी या विज्ञान शिबीरात भाग घेतला. यामध्ये विज्ञानाच्या मुलभूत संकल्पना त्यावरील आधारित प्रतिकृती म्हणजे विविध मॉडेल विद्यार्थ्यांनी समजून घेत प्रत्यक्षात साकार केले. आवाजाची उत्पत्ती कशी होते. घरातील छोट्यात छोट्या वस्तूंपासून हवेतली जाळी कशी तयार होते. कागदापासून सॅटेलाईट बनविले. विद्यार्थ्यांना प्रश्न कौशल्य कृतिपुस्तिकेतून मार्गदर्शन करण्यात आले. कविता, गाणी, गोष्टी यातून विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपला अनुभव सांगितला.
जैन इरिगेशन कंपनीचे वरिष्ठ सहकारी जन्मजेय नेमाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठिबक हे तंत्रज्ञान कसे तयार झाले याची गोष्ट सांगितली. यामध्ये एका शेतकऱ्याचा झाडांविषयी, रोपांविषयी, पिकांविषयी असलेली निरीक्षण भावना त्यांनी समजून सांगितली. यातून विज्ञानाची उकल होते हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. मनुष्याला पाच ज्ञानेंद्रीय आहेत या ज्ञानेंद्रीयातून ज्या संवेदना आपल्याला समजतात. त्याच भावनेने समाजाकडे बघितले पाहिजे. आजूबाजूच्या परिसराचे, निसर्गाचे निरीक्षण केले पाहिजे यातून समाजाला दिशा देणारे संशोधन निर्माण होते. विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी विज्ञानाच्या संकल्पाना समजून न घेता व्यावहारीक जीवनात त्याचा फायदा कसा होईल, यावर निरीक्षण केले पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. यातून सकारात्मक उत्तर मिळते; असेही जन्मेजय नेमाडे यांनी सांगितले.
प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी मनोगत व्यक्त करताना स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना घेऊन उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हे शिबीर आयोजीत केल्याचे रश्मी लाहोटी यांनी सांगितले. प्रण है.. या प्रार्थनेने शिबाराची सांगता झाली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विणाताई लिमये यांनी केले. आभार ओंकार बाणाईत यांनी मानले.