पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक पार पडली आहे. त्यावेळी जयंत पाटील देखील बैठकीत उपस्थित असल्याचे कळते. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतू . जवळजवळ अर्धा तास बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये लेन नंबर 3 परिसरातील 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. अजित पवार आज पुण्यातील चांदणी चौकच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. त्यानंतर त्यांचा मुक्काम सर्किट हाऊसमध्ये होता. त्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या बैठकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार गटाने जरी भेट झाल्याचं नाकारलं असलं तरी माध्यमांकडे याचे व्हिडीओ आहेत. जर अशी भेट झाली असेल तर दोन्ही नेत्यांपैकी कुणीतरी महाराष्ट्रासमोर येऊन हे काय चाललंय, हे सांगणं गरजेचं आहे. कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन बैठका झाल्या. त्यात विविध नेते मंडळीही उपस्थित होते. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.
माध्यमातून समोर येणाऱ्या दृश्यांवरून प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा देशात आणि राज्यात वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. पवारांना असं जरी वाटलं की दादा आणि पवारसाहेब एकत्र येणार आहेत, तर त्यावरही ते उघडपणे भाष्य करण्याइतके सक्षम आहेत, असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त विविध मराठी वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.