नवी दिल्ली (वृत्तसंस्था) करोना विषाणूचा संसर्ग झालेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची प्रकृती अधिकच बिघडली आहे. त्यांना आता गुरगावमधील मेदांता रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले आहे, असे त्यांच्या कुटुंबीयांनी आज सांगितले.
अहमद पटेल यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर सातत्याने वैद्यकीय पथकाकडून देखरेख केली जात आहे, असे पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती.
आता अधिक तपासणीसाठी त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले गेले आहे, असे फैजल यांनी म्हटले आहे. अहमद पटेल यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, यासाठी शशि थरूर, आनंद शर्मा आणि अशोक गेहलोत या कॉंग्रेस नेत्यंनी शुभेच्छा दिल्या आहेत.