मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवार १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान नदीपात्रात शोधमोहीम घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेले अवस्थेत आढळून आला आहे. पैशांच्या आर्थिक व्यवहारांमधून मित्रानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. नितीन पाटील याच्या एका मुक्ताईनगर येथील मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते.
उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्र मागत होता या रागातून संशयित आरोपी याने गुरुवारी १८ जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.
नितीन पाटील यांचा संपर्क होत नसल्यामुळे त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच नदीपत्रात भेट देण्याचा शोध घेऊन अभ्यास घेतला असून त्याला मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.