पुणे (वृत्तसंस्था) नाना पेठेतील गँगवॉरचा पुन्हा भडका उडाला असून, रविवारी (दि. १) रात्री कुप्रसिद्ध गुंड बंडू राणोजी आंदेकर याचा पुतण्या व माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. वनराज याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता रात्री उशिरा त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
नाना पेठ, भवानी पेठ, गणेश पेठ, सोमवार पेठ, रास्ता पेठ, कॅम्प परिसरात दहशत पसरली. या भागातील सर्व दुकाने व व्यवहार बंद करण्यात आले. वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबला होता. त्या वेळी दुचाकीवर मास्क घालून आलेल्या हल्लेखोराने त्याच्यावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. एक गोळी पिस्तुलात अडकल्याने कोयत्याने वार केले. या हल्ल्यात वनराज जागीच कोसळला.
घटनेची माहिती समजताच या भागातील शेकडो रहिवाशांनी तेथे धाव घेतली. खासगी रुग्णवाहिकेतून वनराज याला रुग्णालयात दाखल केले. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या घटनेचे वृत्त समजल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हल्लेखोरांचा शोध जारी केला आहे.
बंडू आंदेकर व त्याच्या प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. बंडू व त्याच्या साथीदारांसह प्रतिस्पर्धी सूरज ठोंबरे व अन्य टोळ्यांचे १०० हून अधिक गुंड सध्या कारागृहात आहेत. या टोळीयुद्धात गेल्या चार वर्षात सहाहून अधिक बळी गेले आहेत.