मुक्ताईनगर (प्रतिनिधी) माजी सैनिकाचा खून करून १ लाख ६ हजाराची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. वडोदा ते हलखेडा दरम्यानच्या जंगलात पैश्याच्या वादातून ही घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रल्हाद शिवमराम पाटील (वय ५२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक असे की, प्रल्हाद पाटील (रा. सावर्डे ता. कागल जि. कोल्हापूर) हे गावातील मित्र अनिल आनंदा निकम यांच्यासोबत कारने शेगांव दर्शनासाठी ५ नोव्हेंबर रोजी निघाले होते. दरम्यान प्रल्हाद पाटील हे माजी सैनिक असल्यामुळे त्यांच्या परिचयाने व्यक्ती हलखेडा येथे राहत असल्याने त्यांना भेटून पुढे शेगाव दर्शनाला जाणार होते. रात्री ९ वाजता प्रल्हाद पाटील यांनी एका मित्राला फोन करून बोलाविले. त्यावेळी एकजण त्यांना घेण्यासाठी दुचाकी घेवून आला. दुचाकीवर प्रल्हाद पाटील आणि अनिल निकम हे बसून मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वढोदा ते हलखेडा जंगलात गेले. त्याठिकाणी आगोदर ६ साथीदार जण उपस्थित होते.
पैश्यांच्या वादावरून हाणामारी
यावेळी प्रल्हाद पाटील आणि पवार आडनाव असलेल्या तरुणांचा पैश्यांवरून बाचाबाची झाली. यात प्रल्हाद पाटील यांनी पुतण्या यांच्या फोन पे वरून ५५ हजार रूपये दिले. त्यानंतर त्यांच्या सोबत असलेले काही रक्कम असे एकुण १ लाख ६ हजार ५०० रूपये दिले. पुन्हा पैश्यांच्या वादावरून हाणामारी झाली. दोघांना जखमी करून अनोळखी ६ ते ७ जण घटनास्थळाहून पसार झाले. जखमी झालेले प्रल्हाद पाटील यांना उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. अनिल निकम यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात सहा ते सात जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.