चाळीसगाव (प्रतिनिधी) एकाच दिवशी दोन खून झाल्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली. तर जामडी येथे तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. राजेंद्र सुकदेव पाटील (४५, रा. देवळी, ता. चाळीसगाव) आणि तरबेज शहा याकूब शहा (२५, रा. जामडी, ता. चाळीसगाव) अशी खून झालेल्या इसमांची नावे आहेत.
चिंचखेडला वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या तर जामडी येथे तरुणाला चाकूने भोसकले !
देवळी येथील राजेंद्र पाटील हे चिंचखेडे शिवारातील शेतजमीन निमबटाईने अनेक वर्षापासून करीत आहेत. या शेतात कांद्याचे पत्र्याचे शेड असून तेथे गुरे बांधलेली असल्याने शेतकरी राजेंद्र पाटील हे नेहमी रात्री झोपायला जात असत. दि. ७ रोजी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे प्रमाणे शेतात झोपण्यासाठी गेले होते. सकाळी ७ वाजता राजेंद्र पाटील यांना कोणीतरी दांडक्याने डोक्यात वार करून ठार केल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांचा मुलगा मुकेश हा पोलीस पाटलांसमवेत शेतात गेला असता वडिल राजेंद्र पाटील हे रक्ताच्या थोरोळ्यात पडलेले होते.
घटनास्थळी मिळाला रक्ताने माखलेला लाकडी दांडा व दोरी !
मृत राजेंद्र सुकदेव पाटील यांच्या डोक्यावर वार केल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे दिसून आले. तसेच गळ्याजवळ गळा आवळल्याची खूणही दिसत होती. घटनास्थळी दोरी व रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळून आला. राजेंद्र पाटील यांचा खून झाल्याची घटना समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला मुकेश पाटील (२३, रा. देवळी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत.
जामडी येथे तरुणाला चाकूने भोसकले !
जामडी येथील तबरेश शहा याकूब शहा (वय २५) हा तरूण फकीर जामडी येथील गावातील पीर बाबा दर्ग्याजवळ नवसाचा कार्यक्रम असल्याने धार्मिक विधी करीता आला होता. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पाठीमागून आलेल्या एका तरूणाने अचानकपणे येऊन त्याच्यावर तीक्ष्ण व धारदार शस्त्राने पाठीवर सपासप वार केले. यामूळे तबरेश शहा जमिनीवर कोसळताच मारेकरी तरूणाने तेथून पळ काढला. ही घटना समजताच गावातील ग्रामस्थांनी त्यास चाळीसगाव येथे उपाचारार्थ हलविले मात्र वाटेतच त्याचा मृत्य झाला.दरम्यान, पूर्व वैमनस्यातून खून झाल्याची महिती समोर येत आहे.
संशयित ताब्यात !
तरबेज शहा, याच्यावर हल्ला करणारा तरूण जामडी गावातीलच आहे. ग्रामिण पोलिसांनी याप्रकरणी संशयित मारेकरी ईदरीस शेख भिकन शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करीत असून खूनामागचे कारण लवकरच समोर येणार आहे.