चंद्रपूर (वृत्तसंस्था) राजुरा शहरातील सोमनाथ वॉर्डात रविवारी (२३ जुलै) रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा सचिन डोहे (२७) या ठार झाल्या. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास डोहे कुटुंबीय सोमनाथपूर वॉर्डातील आपल्या घरी असताना एक अज्ञात इसम त्यांच्या घरी आला. यावेळी काही बोलण्याचा आवाज ऐकून सचिन डोहे यांच्या पत्नी पूर्वशा या काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी बाहेर निघाल्या. नेमके याचवेळी अज्ञाताने गोळीबार केला. यात दोन गोळ्या पूर्वशा यांना लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या.
यावेळी त्यांच्या घरी असलेल्या लल्ली नामक इसमालासुद्धा एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची वार्ता शहरात पसरताच एकच खळबळ उडाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली आहे. हे प्रकरण नेमके कशामुळे घडले हे मात्र गुलदस्त्यात आहे. सचिन आणि पूर्वशा या दाम्पत्याला दोन मुले आहेत. कोळसा तस्करीतून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
लल्ली शेरगिल हे सचिन डोहे यांच्या घराशेजारीच राहत असून, गोळीबार करणाऱ्याने त्यांचा पाठलाग केल्याने जीव वाचविण्यासाठी ते डोहे यांच्या घरात शिरले. पाठलाग करणाऱ्याने गोळीबार केला त्याचवेळी पूर्वाशा घराबाहेर आल्याने त्यांच्या छातीत गोळी लागली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच घरातील मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना राजुरा येथे दाख केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वाशा डोहे यांना मृत घोषित केले.