धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव सत्यशोधक समाज संघाच्या वतीने तहसील कार्यालयात निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रविकिरण बिऱ्हाडे यांना निवेदन देण्यात आले.
महात्मा ज्योतिराव फुले निर्मित सत्यशोधक समाज स्थापना दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे म्हणजेच सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण वर्षात पदार्पण होत आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गौरविण्यात येते. त्यांनी छत्रपती शिवरायांना आदर्श मानून शूद्र अतिशूद्र व स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले.
सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानून छत्रपती शाहूजी महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जागृती केली. त्यामुळे आधुनिक लोकशाहीभिमुख भारत देशाची निर्मिती झाली परिणामी आपल्या सर्वांना शिक्षण व इतर हक्क अधिकार मिळालेत.
२४ सप्टेंबर या दिवशी आपण सर्वांनी शैक्षणिक संस्थेत, शाळेत, कार्यालयात , सामाजिक संघटनेमार्फत या दिवशी समाज जागृतीचे कार्यक्रम सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षानिमित्त आयोजित करण्यात यावेत अशी विनंती सत्यशोधक समाज संघाच्या सत्यशोधकांकडून करण्यात येत आहे. याप्रसंगी सत्यशोधक आबासाहेब राजेंद्र वाघ, पी.डी.पाटील, हेमंत माळी, अविनाश बाविस्कर, मयूर भामरे, मधुकर माळी, आनंद पाटील, दिनेश भदाणे, गोरख देशमुख, गौतम गजरे, नगरभाई मोमीन, सुरज वाघरे, वैभव पाटील तसेच बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.