गया (वृत्तसंस्था) बोधगया मुलींच्या बालनिरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांकडून इथे आश्रय घेणाऱ्या एका मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. धक्कादायक म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर इतर चार मुलींचाही लैंगिक छळ करण्यात आल्याचंही समोर आले आहे.
बोधगया मुलींच्या बालनिरीक्षणगृहातील ही मुलगी नवादा जिल्ह्याच्या वारसलीगंजची रहिवासी आहे. मानसिकरित्या विक्षिप्त असल्यानं नवादा दिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित मुलीला बोधगयाच्या बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, इथे आपल्यावर वारंवार बलात्कार करण्याचा आल्याचा आरोप पीडितेनं केलाय. प्रत्येक रात्री जेवणानंतर दुधासोबत नशेचे पदार्थ मिसळून प्यायला दिलं जात होतं. त्यानंतर मुलीची शुद्ध हरपली जात होती. सकाळी उठल्यानंतर आपल्याला प्रचंड शारीरिक वेदना जाणवत असत. तसंच सकाळी कपडेही अस्ताव्यस्त अवस्थेत असत, असंही पीडितेनं म्हटलंय.
अगोदर गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेनं याची माहिती बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकांना दिली. मात्र, यानंतर बोधगया मुलींच्या बालनिरीक्षणगृहात आणखीन चार मुलींसोबत अशाच प्रकारच्या अमानवीय लैंगिक छळाचं प्रकरण उजेडात आलं. यामुळे गया जिल्हा प्रशासनासहीत संपूर्ण बिहारच हादरलंय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा बालनिरीक्षणगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.