जळगाव (प्रतिनिधी) शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सदाभाऊ खोत दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात आले आहेत. त्यांनी मंगळवारी रात्री भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. सदाभाऊ खोत म्हणाले की, उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून राज्य सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. एफआरपीचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. यामागे शरद पवारांचा हात आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडू. शरद पवार हे जाणता राजा नाहीत. ते उद्योजकांचे नेते आहेत. त्यांच्या मुखात राम तर बगलेत सुरी असते.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेत २००५ मध्ये करार शेतीचे एक विधेयक आले होते. हे विधेयक म्हणजेच आज केंद्राने पारित केलेले ३ नवीन कृषी कायदे आहेत. गेली अनेक वर्ष या तीनही कृषी कायद्यांचा खरा फायदा कुणी घेतला असेल तर तो शरद पवारांच्या बारामती ऍग्रो कंपनीने घेतला आहे. स्वत: कायद्यांचा लाभ घ्यायचा. मात्र, आता फायदा घेण्याची शेतकऱ्यांची वेळ आल्यावर माझ्या कुटुंबाशिवाय कुणालाही लाभ मिळू नये, अशी दुटप्पी भूमिका पवार घेत असल्याचा आराेप सदाभाऊ खाेत यांनी केला. कृषी कायद्यांच्या विराेधात काल भारत बंद पुकारण्यात आला हाेता. परंतु, या बंदमध्ये शेतकरी कुठेही दिसला नाही. जनतेने या बंदकडे पाठ फिरवली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी तीन कृषी कायदे तयार करून ७० वर्षांच्या गुलामगिरीतून शेतकऱ्यांना मुक्त करण्याचा आशावाद निर्माण केल्याचेही खाेत म्हणाले.
शरद पवारांनी कधीही शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. म्हणून मी त्यांना कधीही जाणता राजा म्हणत नाही. ते त्यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे वागत नाहीत. शेतकऱ्याचा खजिना लुटण्यात ते माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने उसाच्या एफआरपीचे तीन तुकडे करण्यास केंद्राला सांगितल्याचा आरोपही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.