मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत आहेत. यामुळे शरद पवारांनी निवासस्थानीच कोरोनाचा दुसरा डोस घेतला. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करत कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे.
‘आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार! असे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे. तसेच योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.
शरद पवारांनी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात घेतली लस
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 1 मार्च सोमवारी कोरोनाची लसीचा पहिला डोस घेतला होती. मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात त्यांनी कोरोना लस घेतली होती. शरद पवार यांच्यासोबत त्यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित होत्या. तसेच जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहानेही यावेळी उपस्थित होते. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांना सिरमची कोव्हॅक्सिन लस टोचण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी शरद पवारांना पोटदुखीचा त्रास झाला होता. यानंतर ३० मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून पित्ताशयातून खडा काढण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. अखेर, आराम वाटू लागल्याने शनिवारी ३ एप्रिलला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर पत्नी प्रतिभा पवार आणि कन्या सुप्रिया सुळे यांच्यासह ते सिल्व्हर ओकमधील निवासस्थानी परतले होते.