मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही अनेकदा शिवसेना आणि भाजप (shivsena-bjp) हे दोन जुने मित्र पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘रोखठोक’ या सदरामधून या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेना आणि भाजप एकत्र येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारीला भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे, असं रोखठोक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातील रोखठोक या स्तंभातून ही भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर अभद्र टीका करणाऱ्यांची तोंडे २३ जानेवारीस पूर्ण वाकडी झाली. उद्धव ठाकरे समोर आले व भाजपच्या मुखवट्यावरच हल्ला केला! उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने संभ्रम दूर झाला. शिवसेना आणि भाजपचे ‘आतून काही सुरू आहे’ या अफवांना पूर्णविराम मिळाला! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर भाजप नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. उद्धव ठाकरे कोठे आहेत? अशी शंका चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी उपस्थित केली. विरोधकांच्या सर्व ‘लघुशंका’ २३ जानेवारी रोजी त्यांच्यावरच उलटल्या, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.
जन्मास येऊन काय दिवे लावले?
भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय शिवसेनेची वाढ शक्यच नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी. शिवसेनेचा जन्म १९६६ सालातला. भारतीय जनता पक्षाने १९८० साली डोळे उघडले. त्यामुळे भाजपच्या मदतीने शिवसेना उभी राहिली आणि वाढली हा दावा चुकीचा आहे. कोण कोणाच्या आधी जन्मास आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा हल्ला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर चढवला.