मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने होणार नसून, प्रत्यक्ष मेळावा घेण्यावर चर्चा सुरू आहे. आणि याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांची राऊतांनी काल भेट घेतली. या पार्श्वभूमीवर आज ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांना दसरा मेळावा होणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, दसरा मेळावा नक्कीच होईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने होणार नाही हे निश्चित. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन दसरा मेळाव्यासंबंधित निर्णय घेण्यात येईल.
मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही
राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उरलेला नाही, असा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. महानगरपालिकेने उच्च न्यायालयात तशी माहिती दिली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या २५८६ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर ३९४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.