परभणी (वृत्तसंस्था) : शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही. राज्यात एका विपरीत स्थितीत महाविकास आघाडी झाली होती, असे वक्तव्य करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.आज परभरणीत काँग्रेसच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोलेंनी महाविकास आघाडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी ते बोलतांना म्हणाले.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज मुख्यमंत्री शिंदे व पंतप्रधान मोदींची जाहीरात झळकली आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेला खोके पोहोचले का?, असा सवाल मनसेने केला होता. त्यावर नाना पटोलेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता शिवसेना हा आमचा नैसर्गिक मित्र नाही, अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली. नाना पटोले म्हणाले, राज्यात एका विपरित स्थितीत महाविकास आघाडी झाली होती. तेव्हा भाजप व शिवसेनेमधील भांडण व नंतर झालेला पहाटेचा शपथविधी सगळ्यांच्या परिचयाचा आहे. केवळ भाजपला विरोध म्हणून किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीची स्थापना झाली होती.
नाना पटोले म्हणाले, ज्यांना आमची विचारसरणी मान्य आहे. जे आमच्या विचारसरणीच्या सोबत आहे, तेच आमचे मित्र असतील. भाजप देशाचे मोठे नुकसान करत आहे. त्यामुळे अशा भाजपसोबत आमच्या मित्रपक्षांचा संबंध नसावा, असे आमचे म्हणणे आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या एमसीए निवडणुकीत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्र आल्याचे सर्वांनी पाहिले. त्यामुळे महाविकास आघाडीबाबत आम्ही अजूनही संभ्रमात आहोत.