मोताळा (वृत्तसंस्था) एका लग्नकार्यात सूत्रसंचालनादरम्यान आपले नाव न घेतल्यामुळे स्थानिक शिवसेना नेत्याने पत्रकार (attack on journalist) असलेल्या सूत्रसंचालकाच्या घरावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील मोताळा इथं घडली आहे.
मोताळा येथील माळी कुटुंबात लग्न होत, लग्नात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत समारंभाच सूत्रसंचालन स्थानिक पत्रकार गणेश झंवर यांच्याकडे होते. सत्कार तथा आलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करतांना झंवर यांना आयोजकांनी दिलेल्या यादी नुसार नावे घेण्यात आली. त्यात शिवसेना नेते शरद पाटील यांचे नाव नसल्याने ते घेतले नाही. शरद पाटील यांना या गोष्टीचा इतका राग आला की, त्यांनी लग्नमंडपातच गणेश झंवर यांना “पाहून घेण्याची” धमकी दिली. त्यानंतर लग्न सोहळा आटोपून गणेश झंवर हे घरी परतले.
घरी आल्यावर शरद पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गणेश झंवर यांच्या घरावरच जीवघेणा हल्ला केला असा आरोप गणेश झंवर यांनी केला. लोखंडी रॉड, लाकडी राप्टर, लाठ्याकाठ्या घेऊन पाटील पिता-पुत्राने झंवर यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यात पत्रकार गणेश झंवर आणि त्यांच्या पत्नी अनिता झंवर यांच्यासह झंवर परिवारातील धनराज, वैभव, विवेक झंवर हे जखमी झाले आहेत.
दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रारी
झंवर कुटुंबाने बोराखेडी पोलिसांमध्ये दोन्ही बाजूने परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 13 जनांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने परिसरात शिवसेना नेत्यांची वाढलेली दादागिरीची चांगलीच चर्चा रंगली आहे. या बाबतीत आम्ही आरोपी शिवसेना नेते शरद पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. झवर कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी असून खाजगी रुग्णालयात भर्ती आहेत.
या घटनेत सत्यता जाणून पोलिसांनी 307 कलमांव्ये गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जखमी गणेश झवर यांनी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. जर पोलिसांनी ही कारवाई केली नाही तर रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यल्यासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा गणेश झवर यांनी दिला.