मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. प्रवर्तन संचालनालयाने सरनाईकशी संबंधित 10 ठिकाणी छापे टाकले. तसेच, त्यांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावर अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कारवाईमागे केंद्र सरकारचा हात असल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सांगितले. मात्र, कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.
माध्यमांशी बातचीत मध्ये निरुपम म्हणाले की, ‘शिवसेना भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारामुळे शिवसेना नेत्यांकडे प्रचंड संपत्ती आहे. मला माहित नाही की, सरनाईक यांनी काय काय केलं आहे. पण, याप्रकरणी राजकारण न होता, प्रताप सरनाईक यांची चौकशी व्हावी.’ यासोबतच निरुपम पुढे म्हणाले की, ‘फक्त सरनाईकच नाही, तर शिवसेनेच्या इतर अनेक नेत्यांनी भ्रष्टाचारातून भरपूर संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे फक्त राजकीय द्वेशातून या प्रकरणाकडे न पाहता, त्या सर्वांचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी,’ असे मत निरुपम यांनी व्यक्त केले.
काय आहे प्रकरण ?
शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सध्या शोधमोहीम सुरु आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले होते. तसेच ईडीने विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.