धरणगाव (जयेश माळी) मागील २० ते २५ दिवसापासून शहरात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी पालिकेवर मोर्चा काढला होता. मुख्याधिकारी हे कार्यालयात नव्हते. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्यांना पालिकेत येण्याची विनंती केली. परंतू मुख्याधिकारी न आल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक होत, त्यांनी थेट उड्डाण पुलावर रास्तारोको सुरु केले आहे.
आज शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा धडकला. परंतू याठिकाणी जबाबदार अधिकार उपस्थित नसल्यामुळे नागरिक अधिकचे संतप्त झाले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला हार घालत कॅबीनला टाळे ठोकून आंदोलनकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात आज सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पालिकेवर धडकला. या मोर्चात संतप्त महिला, नागरीक अबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी कार्यालयात हजर नसल्यामुळे संतप्त महिलांनी थेट त्यांचे कॅबीन गाठले. यावेळी उषाताई वाघ यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घातला. त्यानंतर थेट कॅबीनला टाळे ठोकले. यावेळी काही महिलांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबीन बाहेर हंडे फेकत ठिय्या मांडला होता. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, गोविंद कंखरे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, मुख्याधिकारी यांना बोलावून देखील ते येत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी थेट उड्डाण पूल गाठला आणि त्याठिकाणी रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे. मुख्याधिकारी येत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करू अशी भूमिका घेत रास्तारोको आंदोलन सुरु आहे. त्यामुळे दुतर्फा वाहतूक विस्कळीत झाली होती. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत आंदोलन सुरुच होते.