मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी आधी शिवसेनेनं स्वत:च मन शुध्द करावं आणि मग बाळासाहेबांच्या स्मारकाचे शुद्धीकरण करावं, अशी टीका शिवसेनेवर केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, “स्मारकाचा अभिमान असेल तर दलदलीमधील असणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकाचं आधी सुशोभीकरण करावं. जे गोमुत्र शिंपडायला आलेले ना त्यांनी ते स्मारक जागतिक दर्जाचं कसं होईल याकडे पहावं. त्यांनी आधी स्वत:चं मन शुद्धीकरण करावं, मग स्मारकाचं शुद्धीकरण करावं.” गोमुत्र का शिंपडलं ते ते शिंपडणाऱ्यांना विचारा असंही नारायण राणे म्हणाले. राज्यात सुडबुध्दीने वागणाऱ्या सरकारने, खोटे गुन्हे नोंद करणाऱ्या सरकारने त्यांच्या डोक्यावर दिल्लीत कोणीतरी बसलंय हे लक्षात ठेवावं असा इशाराही नारायण राणेंनी दिला.
नारायण राणे म्हणाले की, “मुंबईत गेली अनेक वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे, त्यांनी मुंबई बकाल केली. मुंबईतला ३२ वर्षांचा बकालपणा संपवण्यासाठी सत्ता परिवर्तन होणं गरजेचं आहे, भाजपची सत्ता येणं आवश्यक आहे. मुंबईत भाजपची सत्ता येणार आणि त्याला आम्ही जागतिक दर्जाचे शहर करणार.” आता हिंदुत्वाच्या मुद्द्याचा त्याग करुन शिवसेनेने लाचारी पत्करली आहे. त्यामुळेच आज शिवसेना ही सोनिया गांधींनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहत असल्याचं नारायण राणे म्हणाले. शिवसैनिकांचं खरं रुप काय आहे हे वेळ आल्यावर सांगणार, ती वेळ त्यांनी येऊ नये असंही नारायण राणे म्हणाले.