पारोळा (प्रतिनिधी) शिवसेनेत नुकत्याच झालेल्या खांदेपाळतानंतर याचे तीव्र पडसाद पारोळ्यात उमटले आहेत. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांचे शुभेच्छा बॅनर फाडण्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर काळी शाई फेकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा ५ जून रोजी वाढदिवस होता. यानिमित्त शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांनी अमळनेर फाट्याजवळ पालकमंत्री ना. पाटील यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावले होते. दरम्यान, चोरवड येथील रहिवासी सचिन पाटील व पराग गुंजाळ हे अमळनेर येथून ६ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास परत येत होते.
यावेळी तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात तरुण या बॅनरवर दगड व काळी शाई फेकत होते. या दोघांना पाटील व गुंजाळ यांनी या संदर्भात हटकले असता त्या दोन्ही तरुणांनी त्यांच्या दगड फिरकवत धमकी दिली. शिवीगाळ करत त्या दोघांनी पलायन केले. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात दोन्ही अज्ञात तरूणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या पारोळा शहरातील कार्यकर्त्यांनी लावलेल्या अभिनंदनाच्या बॅनरची मोडतोड करण्यात येऊन त्या बॅनरवरील पालकमंत्र्यांच्या फोटोवर काळी शाही फेकुन पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयाविरुद्ध काही व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे. याबाबतीत पारोळ्याचे माजी तालुका प्रमुख दौलत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मी पक्षात सक्रिय आहे की नाही, यापेक्षा मी वंदनीय बाळासाहेबांचा भक्त आहे. मी त्यांच्या विचारांनी घडलो आहे. त्यामुळे शहरात जो प्रकार घडला तो निंदनीय असून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या प्रवृत्तीचे कुणीही समर्थन करणार नाही, अशा शब्दात दौलत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.