नाशिक (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांनी परस्परांतील वाद संपवून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युती करावी. शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असेल, तर एकत्रित बसून दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घ्यावे, असा फाॅर्म्युला भाजप आणि शिवसेनेला सुचविणार असल्याचे केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास (Ramdas Athawale) आठवले यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने सध्या मुख्यमंत्रिपदाचा कारभार शिवसेनेतील अन्य कुणाकडे तरी सोपवण्याचा विचार सुरू आहे. यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यावे. पण सेना ऐकणार नाही. त्यामुळे हे जमत नसेल तर मुख्यमंत्रिपद पाच वर्षे सेनेला आणि उपमुख्यमंत्रिपद भाजपला असा फॉर्म्युला ठरवावा. पण, सेना आणि भाजपने एकत्र यावे, असे मत रामदास आठवले यांनी मांडले.
यावेळी त्यांनी केवळ विरोधकांनाच नव्हे तर केंद्रातील भाजप सरकारलाही इशारा दिला. पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असून भाजपसोबत युती करण्याची इच्छा आहे. सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर लढू. पण, तरीही भाजपला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करू. गोव्यात आम्ही एकही जागा लढणार नसून त्याबदल्यात भाजपने आम्हाला महामंडळ द्यावे. उत्तर प्रदेशात मायावतींचा जनाधार घटत असल्याने आरपीआय पर्याय ठरू शकतो. या ठिकाणी भाजपला आमचा फायदा होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
येत्या ९ जुलैला दलित पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत असून या संघटनेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे का, यावर मंथन सुरू आहे. समाजाला जोडण्यासाठी एकसंघ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांतील लोकांना जोडण्याचे काम केले,असे आठवले म्हणाले.