जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आक्रमक झालेल्या जळगावातील शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाच्या आवारात कोंबड्या फेकून निषेध नोंदवला. एवढेच नव्हे तर काही शिवसैनिकांनी थेट भाजप कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सामोरासमोर आले होते. यामुळे काही वेळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तणाव वाढला नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले असून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या पाठोपाठ आता जळगावातील शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ठिकठिकाणी जोरदार आंदोलने करण्यात आली. जिल्हा शिवसेनेतर्फे महापालिकेच्या समोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘वसंत स्मृती’ या कार्यालयावर घोषणाबाजी करून धडक दिली. यावेळी नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देण्यात आला. शिवसेनेच्या आंदोलनानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त राखल्याने काही अनर्थ झाला नाही. यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ, महापौर जयश्रीताई महाजन, सुनिल महाजन, गजानन मालपुरे, शिवराज पाटील, शोभा चौधरी, सरीता माळी, राजु चव्हाण, विराज कावडीया, ज्योती शिवदे, प्रशांत सुरळकर, अमित जगताप यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.