जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनाळा येथे दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी एका कापूस व्यापाऱ्याला आडवून सात लाखांची रक्कम लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, संजय रामकृष्ण पाटील असं फिर्यादी कापूस व्यापाऱ्याचं नाव आहे. फिर्यादी रामकृष्ण पाटील बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीने पहुरकडे चालले होते. सोनाळा येथील तलावाजवळून जात असताना, समोरून दोन दुचाकीवरुन आलेल्या चार भामट्यांनी त्यांना अडवलं. आरोपींनी फिर्यादीला बंदूक आणि चाकुचा धाक दाखवत त्यांच्या गाडीच्या हँडलला अडकवलेली पैशांची बॅग घेऊन पळ काढला आहे. यावेळी संजय पाटील यांच्यासोबत गावातील १३ वर्षीय हितेश नाना पाटील हा लहान मुलगा देखील होता. स्वत: सोबतच लहानग्या हितेशला काही ईजा पोहचू नये. म्हणून संजय पाटील यांनी अज्ञात चोरट्यांचा कोणताही प्रतिकार केला नाही. ही घटना घडल्यानंतर पाटील यांनी पहुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर, घटनास्थाळाचा पंचनामा केला आहे. या घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत.